मालेगाव, दि. 21 ऑगस्ट,2025 (उमाका वृत्तसेवा):
मालेगाव तालुक्यातील विविध विकास कामे प्रगतीपथावर आहेत. त्याअनुषंगाने ती कामे दर्जेदार व गुणवत्तापुर्ण होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून सबंधित विभागाने ही कामे लवकरात लवकर पुर्ण करून प्रलंबित विकास कामे तत्काळ मार्गी लावण्याचे निर्देश राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
शासकीय विश्रामगृह येथे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मालेगाव शहर व तालुक्यातील विकासकामे व शासकीय वसतिगृहांचा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, महानगरपालिकेचे आयुक्त रविंद्र जाधव, जिल्हा परिषद, नाशिक बांधकाम (इवद-2)चे कार्यकारी अभियंता पंकजकुमार मेतकर, पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंता वैशाली पाटील, जिल्हा परिषद नाशिक लघुपाटबंधारे विभागाच्या जिल्हा जलसंधारण अधिकारी वैशाली ठाकरे, समाज कल्याण अधिकारी देविदास नांदगावकर, प्रकल्प अधिकारी आकुनुरी नरेश, उप विभागीय जलसंधारण अधिकारी रविंद्र सुर्यवंशी, जलसंधारण अधिकारी ओमकार पाचपिंड, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज डोके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वाय.एस. कोरके, गट विकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षणमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, तालुक्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांना अत्याधुनिक, दर्जेदार व शाश्वत सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्याअनुषंगाने तालुक्यातील रस्ते सिमेंट क्राँकीटीकरण करुन ती गुणवत्तापुर्ण करावीत. रस्त्यालगतचे अतिक्रमण संबंधित विभागाने काढावेत. तसेच बंधारे, पाझर तलाव, वळण बंधारे यांची आवश्यक ती दुरुस्ती करावी. तालुक्यातील तीर्थक्षेत्रांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आवश्यक ती विकास कामे तत्काळ करावीत. त्याचबरोबर शाळा, अंगणवाडी, नवीन प्राथमिक केंद्रांची आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी. मोसम नदीवरील नवीन पुलाचे काम लवकरात लवकर पुर्ण करावे. रस्त्यावरील अडथळे दूर करावीत व पथदिवे दुरुस्ती करावी आदी सुचना शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी तालुक्यातील विविध शासकीय वसतिगृहांचा आढावा घेतला. ते म्हणाले की, शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निवास, भोजन व्यवस्था, वीज, पाणी, पुरेशी आवश्यक सुरक्षा व्यवस्था आदी आवश्यक त्या मुलभुत सुविधा पुरविण्यात याव्यात. विद्यार्थ्यांची वेळोवळी आरोग्य तपासणी करण्यात यावी. विद्यार्थ्यांना आवश्यक ग्रंथालय, अभ्यासिका उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात व कोणत्याही प्रकारे त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
Comments
Post a Comment