प्रवाशांच्या सेवेसाठी अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त सुसज्ज इमारत उपलब्ध होणार : शिक्षण मंत्री दादाजी भुसे..... नवीन बसस्थानक व आगार या नवीन इमारतीचे भुमिपुजन कार्यक्रम संपन्न
प्रवाशांच्या सेवेसाठी अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त सुसज्ज इमारत उपलब्ध होणार : शिक्षण मंत्री दादाजी भुसे
नवीन बसस्थानक व आगार या नवीन इमारतीचे भुमिपुजन कार्यक्रम संपन्न
मालेगाव, दि. 25 जुलै,2025 (उमाका वृत्तसेवा): सर्वसामान्यांसाठी एसटी महामंडळ हे परिवहनाचे प्रमुख साधन असून एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांना अत्याधुनिक व दर्जेदार सुविधा देण्यासाठी शासन कटिबध्द आहे. त्याअनुषंगाने मालेगाव बसस्थानक नवीन इमारतीचे काम दर्जेदार, अत्याधुनिक व जलदगतीने होणार असून प्रवाशांच्या सेवेसाठी अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त इमारत उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते मालेगाव येथील नवीन बसस्थानक व आगार या नवीन इमारत भुमिपुजन कार्यक्रम आज संपन्न झाला. या यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, नाशिक विभाग नियंत्रक किरण भोसले, विभागीय सांख्यिकी अधिकारी मिलिंद पानपाटील, विभागीय अभियंता स्थापत्य चैताली भुसारे, उप परिवहन अधिकारी विनोद जाधव ,आगार व्यवस्थापक मनिषा देवरे, सहायक कार्यशाळा अधीक्षक योगेश कोल्हे, सहायक वाहतूक अधीक्षक सुनील पानसरे, दीपक रामराजे यांच्यासह प्रवासी, चालक, वाहक, एसटी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री श्री. भुसे म्हणाले की, वाहनतळाचे ट्रिमिक्स व काँक्रीटीकरण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्राप्त निधीमधून या बसस्थानक परिसरातील काम दर्जेदार वर्षानुवर्ष सुस्थितीत राहील या पध्दतीने झाले आहे. तसेच या नवीन बसस्थानकात प्रवाशांसाठी अद्ययावत व सुसज्ज इमारत उपलब्ध होणार असून या इमारतीचे काम दर्जेदार होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. या नविन इमारतीत मिटींग हॉल, दिव्यांगांसाठी व्हिल खुर्चीची सुविधा, नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा, विश्राम गृह, पार्किंग सुविधा, आरक्षण सुविधा ,सुसज्ज प्रतीक्षालय, हिरकणी कक्ष, उपहारगृह आदी मुलभुत सुविधा उपलब्ध होणार आहेत. मालेगाव बसस्थानकात प्रवाशांसाठी अजून काही नवीन आवश्यक अत्याधुनिक सोयीसुविधा पुरवून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु असल्याचे मंत्री श्री. भुसे यावेळी सांगितले.
मंत्री श्री. भुसे पुढे म्हणाले की, एसटी महामंडळाचा काळानुरुप बदल झालेला आहे. एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार व मागणीनुसार आतापर्यंत विविध पर्यावरणपुरक व सोयीसुविधायुक्त बससेवा सुरु असून प्रवाशीही त्याचा लाभ घेत आहेत. येणाऱ्या काळात नवीन बसेसची संख्या आणखी वाढविण्यात येणार असून इलेक्ट्रॉनिक बसेसही टप्याटप्याने सुरु करण्यात येणार आहे. शासनाने नेहमीच परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे, प्रवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिले आहे.
शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून महिलांना एसटीच्या तिकीट भाडे शुल्कात सरसकट 50 टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना, दिव्यांगासाठी योजना, आहिल्याबाई होळकर योजना, विद्यार्थ्यांसाठी मासिक पास योजना आदी विविध कल्याणकारी योजना प्रवाशांसाठी राबवित आहे व त्याचा मोठया प्रमाणात लाभ प्रवासी घेत असून प्रवासी संख्या वाढली आहे, असे मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.
मंत्री श्री. भुसे पुढे म्हणाले, मालेगाव शहराचा सर्वांगिण विकास होण्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच मालेगाव तालुक्यात होत असलेल्या विविध विकास कामांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले.
आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी मार्गदर्शन केले
Comments
Post a Comment