नागरिकांना अत्याधुनिक व दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यास कटिबध्द : शिक्षणमंत्री ना.श्री.दादाजी भुसे


नागरिकांना अत्याधुनिक व दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यास कटिबध्द : शिक्षणमंत्री ना.श्री.दादाजी भुसे

*📍मालेगाव | २१ ऑगस्ट २०२५ मालेगाव शहर व तालुक्यातील आरोग्य विभाग, मनपा मालेगाव तसेच जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत सर्व शासकीय रुग्णालयांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक शालेय शिक्षणमंत्री ना. श्री. दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह, मालेगाव येथे पार पडली. या बैठकीस वैद्यकीय अधिकारी, मनपा आयुक्त तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान मंत्री महोदयांनी शहर व तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या डेंग्यू व मलेरिया या साथीच्या आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट निर्देश दिले. शहरातील सर्व भागांत तसेच ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणावर फवारणी करावी, जनजागृती मोहिमा राबवाव्यात तसेच स्वच्छतेवर विशेष भर द्यावा असे आदेश त्यांनी दिले. शहरातील ड्रेनेज व्यवस्थेचे काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, तसेच द्याने अल्पसंख्यांक रुग्णालयाचे काम वेगाने पूर्ण व्हावे यासाठी कार्यवाही गतीमान करावी असेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी पोळा व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात उपलब्ध होणाऱ्या खाद्यपदार्थांची तपासणी काटेकोरपणे व्हावी आणि भेसळ होऊ नये याची विशेष काळजी घ्यावी, अशी सूचना देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शाळांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यावर भर द्यावा तसेच शासनाच्या हेल्थ कार्ड योजनेसाठी प्रयत्न अधिक प्रभावी करावेत, असेही त्यांनी सांगितले. शहरात मोकाट जनावरांची समस्या गंभीर स्वरूप धारण करत असल्याने त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, जेणेकरून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
मालेगाव सामान्य रुग्णालयासंबंधी चर्चा करताना मंत्री महोदयांनी रुग्णालयातील ओपीडी महिन्याला ३५ हजारांहून अधिक रुग्णांना सेवा देत असतानाही औषधांचा पुरवठा अपुरा आहे, डायलिसिससाठीची सामग्री केवळ एका आठवड्यासाठी शिल्लक आहे तसेच एक्स-रे मशीन कार्यरत नसल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्या लक्षात घेता जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून औषधे, डायलिसिस साहित्य व आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिले. महिला व बाल रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याचे निदर्शनास आल्याने तातडीने आवश्यक औषधे पुरविण्याचे निर्देश देखील दिले.

ग्रामीण रुग्णालयांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागात स्वच्छतेची प्रभावी अंमलबजावणी, फवारणी तसेच साथीच्या आजारांविषयी जनजागृती मोहिमा राबविण्याचे आवाहन मंत्री महोदयांनी केले.

Comments