गोवंश रक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत मालेगावच्या पांजरापोळ संस्थेचे कार्य अत्यंत प्रशंसनीय आणि अनुकरणीय असल्याचे नमूद करत सेवाभावी वृत्तीने असे पवित्र कार्य करणाऱ्या संस्थांना शासनाकडून भरभक्कम पाठबळ दिले जाईल :-शिक्षणमंत्री ना. मा. दादाजी भुसे
गोवंश रक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत मालेगावच्या पांजरापोळ संस्थेचे कार्य अत्यंत प्रशंसनीय आणि अनुकरणीय असल्याचे नमूद करत सेवाभावी वृत्तीने असे पवित्र कार्य करणाऱ्या संस्थांना शासनाकडून भरभक्कम पाठबळ दिले जाईल :-शिक्षणमंत्री ना. मा. दादाजी भुसे
मालेगाव : गोवंश रक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत मालेगावच्या पांजरापोळ संस्थेचे कार्य अत्यंत प्रशंसनीय आणि अनुकरणीय असल्याचे नमूद करत सेवाभावी वृत्तीने असे पवित्र कार्य करणाऱ्या संस्थांना शासनाकडून भरभक्कम पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
पांजरापोळ संस्थेच्या दाभाडी येथील गो शाळेत २५ लाख रुपये खर्चाच्या रस्ता कॉंक्रिटीकरण व गाय गोठा कामाचे उद्घाटन रविवारी मंत्री भुसे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी भुसे बोलत होते. गोवंश रक्षणाचे काम करणे सोपे नसून फार जिकिरीचे असते. त्यासाठी करावा लागणारा दैनंदिन खर्च मोठा असतो. तसेच काही लोकांशी वाईटपणा देखील घ्यावा लागतो. परंतु कुठलीही तमा न बाळगता पांजरापोळ संस्थेचे विश्वस्त पदरमोड करुन हा सर्व खर्च भागवत असतात. या चांगल्या कामात समाजातील दानशूर व्यक्ती देखील हिरीरीने योगदान देत असतात असे म्हणत त्याबद्दल भुसे यांनी सर्वांचे कौतुक देखील केले.
गोवंशाचे रक्षण करण्यासाठी शासन अत्यंत संवेदनशील आहे. त्यासाठी शासनाने देशी गायीला राज्य माता,गोमाता म्हणून दर्जा दिला आहे. तसेच अधिकृत संस्थांकडून चालविल्या जाणाऱ्या गोशाळांमधील देशी गायींसाठी प्रत्येक दिवसांसाठी प्रतिगाय पन्नास रुपये याप्रमाणे शासनाकडून अनुदान सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार मालेगावच्या पांजरापोळ संस्थेस अनुदान सुरू झाले असून तीन महिन्यांचा पहिला हप्ता प्राप्त झाल्याचे भुसे यांनी सांगितले. पांजरापोळ संस्थेतर्फे मालेगाव, कुकाणे व दाभाडी अशा तीन ठिकाणी गोशाळा चालविल्या जातात. या तिन्ही ठिकाणी एकावेळी किमान दीड हजारावर गोवंशांच संगोपन केले जाते. त्यासाठी चारा व अन्य स्वरूपाचे व्यवस्थापन करणे,ही फार मोठी बाब असल्याचे भुसे म्हणाले. या गोशाळांमध्ये आणखी काही सुधारणा तसेच सुविधा निर्माण करण्यासाठी संस्थेने प्रकल्प आराखडा दिला तर त्यासाठी शासन स्तरावरून आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन भुसे यांनी दिले.
आगामी काळात लहान बछडे व गायींसाठी गो शाळेत स्वतंत्र व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. तसेच या शाळेत लोकांचा राबता वाढावा म्हणून उपलब्ध जागेत बगीचा, लहान मुलांसाठी खेळणी असा उपक्रम राबविण्याचा मनोदय संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह शास्त्री यांनी यावेळी बोलून दाखवला. सचिव संदीप भुसे यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या कामांची माहिती विशद केली. याप्रसंगी विशेष सरकारी वकील शिशिर हिरे,हरिप्रसाद गुप्ता,भगवान बच्छाव,अजय मामा मंडावेवाला यांनी मनोगत व्यक्त केले. २२ जुलै हा दिवस आता शासनाकडून शुध्द देशी गोवंश रक्षण व संवर्धन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने पांजरापोळ संस्थेतर्फे यावेळी दाभाडी येथील गो शाळेतर्फे गोवंश प्रेमींचा स्नेहमेळावाही आयोजित करण्यात आला होता. तसेच मालेगावच्या क्रेडाई शाखेतर्फे गोशाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, दाभाडी चे सरपंच प्रमोद निकम, निळकंठ निकम, पवन टिबडेवाल, नटवर दायमा,जवाहरलाल नानावटी, ब्रिजलाल बाहेती,प्रदीप कापडिया, प्रकाश शाह,अशोक कांकरिया, जगदीश काबरा,गौतम शाह,परेश शाह आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment