तालुक्यातील धरणे पूर पाण्याने भरण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे : शिक्षणमंत्री दादाजी भुसेतालुक्यातील पिक- पाणी व टंचाई आढावा बैठक संपन्न


तालुक्यातील धरणे पूर पाण्याने भरण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे : शिक्षणमंत्री दादाजी भुसे

तालुक्यातील पिक- पाणी व टंचाई आढावा बैठक संपन्न

मालेगाव, (उमाका वृत्तसेवा): तालुक्यातील नद्या पावसाच्या पाण्याने वाहत असून ते पाणी वाया न जावू देता जी धरणे अद्याप पुर्ण क्षमतेने भरलेले नाहीत ती धरणे पूर पाण्याने भरण्यासाठी काळजीपुर्वक व काटेकोरपणे नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे मालेगाव तालुक्यातील पिक-पाणी व टंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उप विभागीय अधिकारी नितीन सदगिर, उपविभागीय कृषी अधिकारी संदीप मेढे, तहसिलदार विशाल सोनवणे, गट विकास अधिकारी चंद्रकांत साबळे, तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे नगररचना विभागाचे नगर रचनाकार अंकीत बुरड, कार्यकारी अभियंता मनोज डोके,महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी म.अ. महाजन, भमिअभिलेखचे उप अधिक्षक अल्पेश पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, सरपंच, तलाठी ,पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

शिक्षणमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, तालुक्यातील काही भागात पावसाचा खंड पडला आहे. त्याअनुषंगाने तालुक्यातील काही गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. तसेच ज्या गावांमध्ये विहिरी, बोअरवेल नादुरुस्त आहेत ते दुरुस्तीची मोहिम हाती घ्यावी. त्याचप्रमाणे गुरांना चारा, पिण्याच्या पाण्याचे, गावांना टँकर पुरवठा आदी कामांचे नियोजन काटेकोरपणे करावे, अशा सुचना शिक्षणमंत्री श्री. भुसे यांनी संबंधित विभागाला यावेळी दिल्या.

शिक्षणमंत्री श्री. भुसे पुढे म्हणाले की, पिक विमा योजनेंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याने नुकसानीची तक्रार विमा कंपन्याना प्रशासनाच्या माध्यमातून तत्काळ करावी जेणेकरुन विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत योग्य नुकसान भरपाई मिळण्यास या योजनेच्या माध्यमातून फायदा होईल. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत ई-पिक नोंदणी करुन सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षणमंत्री श्री. भुसे यांनी केले.

तालुक्यात पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध असून आवश्यकतेनुसार युरिया व रासायनिक खतांचा वापर करावा. तसेच पिकांचे पाण्याअभावी नुकसान होवू नये व पिकांना पुरेशे पाणी उपलब्ध होण्यासाठी विज कंपनीने विज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन करावे, अशा सुचना यावेळी शिक्षणमंत्री श्री. भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 

0000000


Comments