नाशिक ग्रामीण जिल्हयातील पोलीस ठाण्यांमधील महिला मदत कक्षांसाठी नवीन ४० मोपेड दुचाकी वाहनांचे वितरण... सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला मदत कक्ष (वुमेन हेल्प डेक्स) स्थापन...

नाशिक ग्रामीण जिल्हयातील पोलीस ठाण्यांमधील महिला मदत कक्षांसाठी नवीन ४० मोपेड दुचाकी वाहनांचे वितरण... सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला मदत कक्ष (वुमेन हेल्प डेक्स) स्थापन... 


नाशिक :- महिलांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र शासन व राज्य शासन हे विविध उपाययोजना राबवित आहेत. महिलांविरुध्दच्या गुन्हयांना प्रतिबंध करणे, गुन्हे उघडकीस आणणे व गुन्हयांचा तपास करणे तसेच महिलांविरूध्द अत्याचाराची प्रकरणे हाताळण्यासाठी जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला मदत कक्ष (वुमेन हेल्प डेक्स) स्थापन करण्यात आलेले आहेत. महिलांचे बळकटीकरण करण्यासाठी निर्भया फंड अंतर्गत नॅशनल काईम रिसर्च ब्युरो, नवी दिल्ली यांचेकडून प्राप्त निधी हा पी.एफ.एम.एस. प्रणालीव्दारे पोलीस घटकांना वितरीत करण्यात आला आहे.
सदर योजनेअंतर्गत महिलांविरुध्दच्या तक्रारींना जलदगतीने प्रतिसाद मिळावा यासाठी, आज दि. २४/०७/२०२५ रोजी नाशिक ग्रामीण जिल्हा घटकातील ४० पोलीस ठाण्यांमध्ये स्थापित करण्यात आलेल्या महिला मदत कक्षांसाठी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री. बाळासाहेब पाटील यांचे हस्ते पोलीस मुख्यालय, आडगाव येथे एकुण ४० नवीन मोपेड दुचाकींचे वितरण करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय श्री. नितीनकुमार गोकावे, राखीव पोलीस निरीक्षक मुख्यालय श्री. पंडीत चव्हाण, पोलीस निरीक्षक मोटर परिवहन विभाग श्री. अनिल घाडगे यांचेसह जिल्हयातील पोलीस ठाण्यांचे महिला अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. सदर सोहळयाप्रसंगी मा. पोलीस अधीक्षक यांनी दुचाकी वाहनांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.
नाशिक ग्रामीण जिल्हयातील पोलीस ठाण्यांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या महिला मदत कक्षांमध्ये संगणक संच, मोबाईल फोन व उपयुक्त साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांना उपलब्धतेनुसार सदर कक्षामध्ये नियुक्त करण्यात येणार आहे. महिला अत्याचारासंबंधीत तक्रारींची शीघ्रतेने दखल घेण्यासाठी महिला मदत कक्षास पुरविण्यात आलेल्या दुचाकी वाहनांचा उपयोग होणार आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा घटकातील अतिदुर्गम भाग, तालुकास्तर तसेच खेडोपाडयांवरील सर्व महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच महिला अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध होण्यासाठी ग्रामीण पोलीस दलातील महिला मदत कक्ष तत्परतेने कार्यरत असून सर्व महिलांनी या सुविधेचा वापर करावा असे आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
नारीशक्ती अधिक प्रबळ व सशक्त करणे, महिलांना त्यांचे दैनंदिन कार्य निर्भयपणे करता यावे, महिला व बालकांसंबंधीत अत्याचार, सार्वजनिक ठिकाणे, शाळा-महाविद्यालये, महिला आश्रमशाळा-वस्तीगृह, कार्यालये याठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार यांना प्रतिबंध होण्यासाठी सदरची वाहने गस्त घालणार असून या वाहनांचा सकारात्मकपणे वापर होणार आहे. महिलांच्या समस्यांचे तातडीने निराकरण व्हावे या उद्देशाने सदर महिला मदत कक्ष तत्परतेने कर्तव्य बजावणार असल्याचे प्रतिपादन यावेळी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी केले आहे.

Comments