पोलीस बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश... पोलीस मंत्रालयात ओळख... खिशात काहीच नाही!, बदलीच्या नावाखाली! पोलिसालाच फसवण्याचा डाव उधळला....! नाशिक हादरले! मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून रचला सापळा; दोघा भामट्यांवर गुन्हा दाखल

पोलीस बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश... पोलीस मंत्रालयात ओळख... खिशात काहीच नाही!, बदलीच्या नावाखाली! पोलिसालाच फसवण्याचा डाव उधळला....! 

नाशिक हादरले! मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून रचला सापळा; दोघा भामट्यांवर गुन्हा दाखल

नाशिक :-पोलीस दलातील बदल्यांचे रॅकेट आणि त्यातील आर्थिक उलाढाली नेहमीच चर्चेत असतात, पण चक्क एका पोलीस कर्मचाऱ्यालाच पोलीस निरीक्षकाच्या बदलीचे आमिष दाखवून तब्बल ३५ लाख रुपयांना गंडवण्याचा प्रयत्न झाल्याचा महाधक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. मंत्रालयात आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संबंध असल्याची बतावणी करत दोन भामट्यांनी हा सापळा रचला होता. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली असून, मुंबई नाका पोलीस ठाण्यात दोघांविरोधात खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या खळबळजनक प्रकरणाची हकीकत अशी की, नाशिकरोड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी प्रशांत शेखर नागरे यांनाच या भामट्यांनी आपले लक्ष्य बनवले. आरोपी नितीन चंद्रकुमार सपकाळे (रा. मालेगाव) आणि सागर बाळासाहेब पांगरे पाटील (रा. सिडको, नाशिक) यांनी नागरे यांच्याशी संपर्क साधला. भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस

निरीक्षक मनोहर कारंडे यांची बदली हव्या त्या ठिकाणी करून देण्याची ‘पॉवर’ आपल्यात असल्याचे त्यांनी नागरे यांना सांगितले.

दिनांक २४ जुलै रोजी रात्रीपासून या कटाची सूत्रे हलू लागली. आरोपींनी नागरे यांना चांडक सर्कल येथे भेटायला बोलावले आणि मोबाईलवरही सतत संपर्क साधून आपल्या ‘वरच्या ओळखी’चे दाखले दिले. “आपल्या ओळखीने काहीही होऊ शकते,” असे सांगत त्यांनी नागरे यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षकाच्या बदलीच्या या ‘डील’साठी त्यांनी नागरे यांच्याकडे चक्क ३५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

मात्र, आरोपींच्या बोलण्यातून आणि अवाढव्य मागणीतून नागरे यांना यात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. एका पोलीस कर्मचाऱ्यासोबतच असा प्रकार घडल्याचे पाहून वरिष्ठ अधिकारीही चक्रावले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या आदेशाने तात्काळ मुंबई नाका पोलीस ठाण्यात या दोन भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा नोंदवला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या नेतृत्वात तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.

या घटनेमुळे पोलीस दलातील बदल्यांसाठी चालणाऱ्या छुप्या अर्थकारणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरोपींच्या अटकेनंतर यामागे एखादे मोठे रॅकेट सक्रिय आहे का, याचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीसच पोलिसांना फसवण्याच्या या धाडसी प्रकारामुळे नाशिक शहरात एकच खळबळ माजली आहे.

Comments